अंबाजोगाई शहरातून जाणाऱ्या मुख्य राज्यरस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून शुक्रवारी धडक मोहीम राबवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयापर्यंतच्या भागातील रस्त्यालगतची अतिक्रमणे नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवली. ऐन सणासुदीच्या काळात ही कारवाई झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात मुख्य अडथळा ठरणारी दुकाने आणि इतर बांधकामे हटवण्यासाठी जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आणि टिप्परचा मोठा ताफा वापरण्यात आला. प्रशासनाने याआधी सूचना देऊनही काहींनी अतिक्रमण न हटवल्याने अखेर पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोझर चालवून रस्ता मोकळा करण्यात आला.
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक व सदरबाजार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम स्वतः उपस्थित राहून ही मोहीम राबवत होती. कारवाईदरम्यान रस्त्यावर स्थानिक लोकांची आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक आणि रुग्णालय परिसरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण लवकरच सुरू होणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे रस्त्याचा प्रश्न सुटणार असला तरी दिवाळीच्या तोंडावर रोजगाराचे साधन हिरावल्याने लहान दुकानदारांचे हाल होत आहेत. आगामी काळात रस्त्याचे काम वेगाने पूर्ण होऊन वाहतुकीची समस्या सुटेल असा अंदाज आहे.