राज्यातील महत्त्वाच्या वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्वर्गीय अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालयातील कामकाजाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी नुकतीच घेतलेली आक्रमक भूमिका आता प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णसेवा आणि प्रशासकीय यंत्रणेत अधिक कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने शासनाने वरिष्ठ पातळीवर महत्त्वाचे बदल केले असून, यामुळे आरोग्य विभागात चर्चांना उधाण आले आहे.
शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची रत्नागिरी येथे बदली करण्यात आली असून प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांची अहिल्यानगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शल्यचिकित्सा विभागातील प्राध्यापक डॉ. मंजुषा लटके यांची पुण्यातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये बदली करण्यात आली आहे.
यापूर्वी सुनेत्रावहिनी पवार यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत रुग्णसेवा, स्वच्छता, औषध पुरवठा, कर्मचारी उपस्थिती आणि कामकाजातील विविध बाबींचा आढावा घेतला होता. सर्वसामान्य रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या होत्या.
स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये उभारलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांवर लाखो नागरिकांचा विश्वास आहे. त्या सुविधांची गुणवत्ता कायम राखत रुग्णकेंद्रित सेवा अधिक प्रभावी व्हावी, यासाठी सुनेत्रावहिनी पवार स्वतः लक्ष घालत असल्याचे या घडामोडींमधून अधोरेखित होत आहे.
प्रशासनातील या बदलांमुळे कामकाजात अधिक शिस्त, जबाबदारी आणि पारदर्शकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरोग्य सेवेत कोणतीही तडजोड न करता सर्वसामान्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काळात बारामतीच्या आरोग्य व्यवस्थेत आणखी सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.