छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन महाराज मंदिर चौकात भरदुपारी १२ वाजेच्या सुमारास एका महिला प्रवाशाला ठगवून सोन्याचे दागिने पळवल्याची घटना समोर आली आहे. गारखेडा भागातील ५६ वर्षांच्या लक्ष्मी धोंडू पवार या सूतगिरणी चौकातून बस स्थानकाकडे निघाल्या होत्या. रिक्षातून उतरून पायी जात असताना एका भामट्याने त्यांना अडवून फसवणूक केली.
त्या अनोळखी तरुणाने लक्ष्मी यांच्याजवळ येत तुम्ही गरीब आहात का अशी विचारणा केली. आपले मालक पुढे थांबले असून ते गरिबांना वस्तू वाटत असल्याचे त्याने सांगितले. त्याने सोबत आणलेली केळी त्यांना देण्याचा प्रयत्न केला. महिलेने उपवास नसल्याचे सांगून नकार दिला पण तो भामटा सातत्याने त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत राहिला.
संशय आल्यामुळे लक्ष्मी यांनी सावध होत गळ्यातील ५ ग्रॅमचे सोन्याचे डोरले आणि ६ सोन्याचे मणी असलेली पोत काढून हातातील एका लहान पाकिटात ठेवली. पण त्या भामट्याची नजर त्यांच्या हातावरच होती. महिला पाकितात दागिने ठेवत असतानाच त्याने ते पाकीट हिसकावून तिथून पळ काढला. महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली पण तोपर्यंत तो आरोपी पसार झाला होता.
या प्रकरणी पीडित महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार शिवाजी शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.