छत्रपती संभाजीनगर शहरात पावसाने दमान दिल्याने जायकवाडी धरण आणि हर्मूल तलावातील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. आगामी दिवसांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, म्हणून महापालिका प्रशासनाने आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. शहरात असलेल्या सार्वजनिक हातपंपांची सद्यस्थिती काय आहे हे तपासण्यासाठी आणि नादुरुस्त पंप सुधारण्यासाठी हे सर्वेक्षण वेगाने सुरू करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने या कामाला वेग दिला असून शहरात एकूण १२०० हून अधिक हातपंप असल्याची नोंद आहे. त्यापैकी तब्बल २९० पेक्षा जास्त पंप बंद असल्याचे समोर आले आहे. रस्ते रुंदीकरण, काँक्रिटचे रस्ते बनवताना ८८ पंप बंद झाले आहेत, तर भूजल पातळी खूप खाली गेल्यामुळे २०२ हातपंपांमधून पाणी येणे बंद झाले आहे. सध्या केवळ ६४९ हातपंपांवरूनच लोकांना पाणी मिळत आहे. भूजल पातळी आणखी खाली गेल्यास ही संख्या आणखी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या सर्वेक्षणादरम्यान अनेक ठिकाणी सार्वजनिक हातपंपांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी देखील प्रशासनाकडे आल्या आहेत. काही जणांनी या हातपंपांवर विद्युत मोटारी बसवून खासगी पाइपलाइनद्वारे पाणी आपल्या घरात नेल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच शाळा, आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमधील विंधनविहिरींची सुद्धा पाहणी करून त्यांची दुरुस्ती केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक हातपंपांचा कोणी खासगी वापर करत असल्यास नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले असून यासाठी ९८२३१४९५०४ हा नंबर देण्यात आला आहे. सार्वजनिक पैशातून उभे राहिलेले हे जलस्रोत गरजच्या वेळी सर्वसामान्यांसाठी खुले राहावेत आणि टंचाईच्या काळात सर्वांना पाणी मिळावे, यासाठी महापालिकेची ही पद्धਤ उपयुक्त ठरणार आहे.