बारामतीमध्ये २८ मे रोजी अजित दादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांना जाऊन चार महिने पूर्ण झाल्यानंतर जय पवार यांनी स्मृतिस्थळी अभिवादन कारण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांनी त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाची आणि बारामतीसाठी केलेल्या कामांची आठवण काढली.
बारामतीच्या विकास प्रक्रियेत अजित दादांनी घेतलेले निर्णय, सर्वसामान्य नागरिकांशी कायम ठेवलेला संपर्क आणि प्रशासनाशी असलेला समन्वय यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. शेती, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाच्या विविध प्रकल्पांमुळे बारामतीचा चेहरामोहरा बदलल्याचे मानले जाते. त्यामुळे आजही दादांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव स्थानिक राजकारण आणि जनसंपर्कामध्ये स्पष्टपणे दिसून येतो.
स्मृतिस्थळी अभिवादनानंतर कसबा परिसरातील राष्ट्रवादी कार्यालयात नियमित जनता दरबार पार पडला. दर गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या जनता दरबारात शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. पाणीपुरवठा, रस्त्यांची कामे, शेतीसंदर्भातील प्रश्न, वीजपुरवठा, शासकीय कार्यालयांतील अडचणी तसेच स्थानिक विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
जय पवार यांनी नागरिकांच्या समस्या संयमाने ऐकत संबंधित विभागांशी तातडीने समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. काही प्रश्नांवर तत्काळ पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले. गेल्या काही महिन्यांत जय पवार यांनी बारामतीतील विविध भागांमध्ये भेटी वाढवत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. युवक, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत स्थानिक प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
बारामतीमध्ये जनतेशी थेट संवाद साधण्याची परंपरा कायम ठेवत स्थानिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. जनता दरबाराला मिळणारा सातत्यपूर्ण प्रतिसाद आणि स्थानिक स्तरावर वाढलेला जनसंपर्क यामुळे जय पवार यांच्या कार्यपद्धतीकडे बारामतीकरांचे लक्ष वेधले जात आहे.