जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू तवी ते श्रीनगर या मार्गावर आता तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या नव्या सेवेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, उधमपूरला या ट्रेनचा थांबा देण्यात आला आहे.
नवीन वंदे भारत एक्सप्रेस 26407/26408 या क्रमांकाने जम्मू तवी-श्रीनगर-जम्मू तवी मार्गावर धावणार आहे. या ट्रेनमुळे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील प्रवाशांना आणखी एक जलद आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
कोणत्या मार्गावर धावणार?
नवीन ट्रेन जम्मू तवी → शहीद कॅप्टन तुषार महाजन उधमपूर → श्री माता वैष्णो देवी कटरा → रियासी → बनिहाल → श्रीनगर या मार्गावर धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. उधमपूरचा समावेश हा स्थानिक प्रवाशांच्या मागणीला मिळालेला प्रतिसाद मानला जात आहे.
जम्मू-श्रीनगर अंतर किती?
जम्मू तवी ते श्रीनगर हे अंतर सुमारे 269 किलोमीटर आहे. सध्या या मार्गावरील वंदे भारत सेवा हे अंतर जवळपास 4 तास 45 मिनिटांत पूर्ण करते.
प्रवाशांना मोठा फायदा
सध्या जम्मू तवी आणि श्रीनगरदरम्यान दोन वंदे भारत गाड्यांच्या चार सेवा सुरू आहेत. या सेवांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वेने अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागणी लक्षात घेऊन विद्यमान गाड्यांमधील डब्यांची संख्या 16 वरून 20 करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
नवीन वंदे भारत सुरू झाल्यानंतर जम्मू आणि श्रीनगरदरम्यान प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना अधिक पर्याय मिळणार आहेत. मात्र नवीन ट्रेनची अधिकृत वेळापत्रक आणि भाड्याची माहिती रेल्वेकडून स्वतंत्रपणे जाहीर होणे अपेक्षित आहे.