लातूर जिल्ह्यातील रेणापूर भागासह ग्रामीण भागातील आठवडे बाजारात आणि गल्लीतील दुकानांमध्ये काळे तिखट, मिरचीपूड, हळद आणि धने पावडर यासह इतर सुट्टे मसाले उघड्यावर विकले जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाने अशा सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर राज्यभरात बंदी घातलेली असतानाही हा प्रकार उघडपणे सुरू आहे. पॅकिंग मसाल्यांपेक्षा हे सुट्टे मसाले थोडे स्वस्त मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्ग ते खरेदी करण्यास पसंती देत आहेत. या उघड्या मसाल्यांवर धूळ आणि कचरा बसून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.
या सुट्ट्या आणि उघड्या मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग, लाकडाचा भुसा, विटांची पावडर आणि विषारी रसायने यांसारख्या घातक पदार्थांची भेसळ केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने मसाले जिथे तयार होतात तिथेच ते बंद पाकिटात सीलबंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र रेणापूर परिसरातील आठवडे बाजारात कोणतेही झाकण न ठेवता या मसाल्यांची विक्री केली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून केवळ शहरी भागातच छापे मारून कारवाई केली जाते, असा आरोप ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. गावाकडच्या आठवडे बाजारात किंवा छोट्या किराणा दुकानात ही तपासणी करण्यासाठी कोणतेही अधिकारी फिरकत नाहीत. त्यामुळे अशा भेसळयुक्त पदार्थांची तपासणी कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने सुट्ट्या आणि विनालेबल मसाल्यांची खरेदी न करण्याचे आवाहन केले असले तरी विक्रीवर पूर्ण बंदी आणण्यात यश आलेले नाही.
आठवडे बाजारात होणाऱ्या या उघड्या विक्रीमुळे सर्वसामान्यांच्या जीवाशी थेट खेळ मांडला जात आहे. प्रशासनाने तात्काळ ग्रामीण भागात मोहीम राबवून अशा विक्रेत्यांवर आणि उत्पादकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. जर या विक्रीवर वेळीच चाप लावला नाही तर भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्याने नागरिकांचे आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.