दिवाळीचा पहिला दिवस आणि शुभमुहूर्त असलेल्या धनत्रयोदशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठेत मोठा उत्साह पाहायला मिळाला. सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने शुक्रवारी शहरातील विविध सुवर्णपेढ्यांमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. सणाच्या तोंडावर धातूंच्या दरांनी उच्चांक गाठला असला तरी लोकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून आली नाही.
या विशेष मुहूर्तावर पिवळ्या सोन्याचा विडा, नवनवीन डिझाइनचे दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, चिंचपेटी यासह चांदीच्या विविध वस्तू आणि मूर्तींना मोठी मागणी होती. काही नागरिकांनी आधीच बुकींग करून या मुहूर्तावर आपले दागिने घरी नेणे पसंत केले. शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति तोळा 1 लाख 46 हजार रुपये तर चांदीचा भाव प्रति किलो 1 लाख 92 हजार रुपयांवर पोहोचला होता.
भाव वाढीचा काहीसा फटका बसला पण मुहूर्तावर खरेदीसाठी सकाळपासूनच शहर आणि परिसरातील दुकानांमध्ये ग्राहकांची तुफान वर्दळ पाहण्यास मिळाली. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या शुभ दिवशी ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सराफा बाजारावर सुमारे 8 ते 10 कोटी रुपयांचा धनवर्षाव झाला आहे.
येणाऱ्या लक्ष्मीपूजन आणि बलीप्रतिपदा निमित्त देखील ग्राहकांचा असाच चांगला प्रतिसाद मिळेल, असा ठाम विश्वास येथील सुवर्ण व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या उलाढालीमुळे स्थानिक व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून आगामी काळात बाजारपेठेत अशीच तेजी कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.