Thursday, 12 November 2026 मराठवाडा, महाराष्ट्र
MU
मराठवाडा अपडेट
मराठवाड्याची प्रत्येक बातमी
ब्रेकिंग न्यूज
छत्रपती संभाजीनगर

समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी छत्रपती संभाजीनगरची गुन्हेगार टोळी पोलिसांच्या जाळ्यात

समृद्धी महामार्गावर शासकीय अधिकाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

मराठवाडा अपडेट डेस्क
04 Nov 2026, 03:46 PM
9,153 वाचले
News Image

समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका शासकीय कार्यकारी अभियंत्याच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना पिस्तूलचा धाक दाखवत ३० हजार रुपयांची रोकड आणि मोबाईल लुटल्याचा प्रकार घडला. दिवसा घडलेल्या या गुन्ह्यात आरोपींनी गाडीसह चालकाचे अपहरण केले होते आणि नंतर त्याला वाटेत सोडून दिले होते. या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर भागातून पाच आरोपींना जेरबंद केले आहे. आकाश मर्दनसिंग उसारे, गोपाल कमलालाल बनमावत, लहू जयसिंग बारवार, दुर्गेश ताराचंद फटपुरे आणि आकाश बाबुलाल शेवाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता खान अब्दुल फरीद अब्दुल हामिद हे आपल्या गाडीतून छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे निघाले असताना हा प्रकार घडला. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी इटिंगा वाहनातून त्यांचा पाठलाग केला आणि फळेगाव-विरुद्धपाडा परिसराजवळ त्यांचे वाहन अडवले. शस्त्राचा धाक दाखवून त्यांना खाली उतरवले आणि स्वतःच्या गाडीत बसवून ३० हजार रुपये तसेच मोबाईल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर चालकाला इगतपुरी परिसराजवळ सोडून आरोपींनी तिथून पळ काढला. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण तालुका पोलिस आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांचे पथक थेट छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपीला टीव्ही सेंटर भागातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या इतर चार साथीदारांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. या शोधमोहिमेत वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, संशयितांकडून पुढील तपास सुरू आहे.

महामार्गावर दिवसाढवळ्या शस्त्राचा धाक दाखवून अशा प्रकारे लुटमार होणे आणि चालकाचे अपहरण होणे यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनांचा पाठलाग करून लोकांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबवण्यासाठी महामार्गावर नियमित पोलिस गस्त वाढवणे गरजेचे बनले आहे. तसेच प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा आणि आपत्कालीन मदत व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी या निमित्ताने पुढे आली असून, या कारवाईमुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.